अच्छे दिन – ते आणि हे

रोज सकाळी….
गुड मॉर्निंग… गुड डे….
पण मी कधी मनाला लावून नाही घेत.

दर २६ जानेवारीला….
सगळे ‘प्रजा-सत्ताक’ म्हणतात;
पण सगळे ‘सत्ताक’ फक्त स्वतःलाच ‘प्रजा’ समजतात.

दर १५ ऑगस्टला ….
नव्याने स्वतंत्र झाल्याची जाणीव करून देतात;
पण माझ्याभोवती तेच कुंपण रचतात.

दर ३१ डिसेंबरला….
नवीन वर्ष सुखाचे.. समृद्धीचे… भरभराटीचे…. ;
पण मला कधी खरे नाही वाटत.

दर वाढदिवसाला ….
हजारो वर्षे जगण्याचे आशिर्वाद देतात;
अन् ऑनर किलींग, कुपोषित, कर्जबाजरी रोज शेकडो मरतात.

प्रत्येक निवडणूकीत….
ती ‘गरीबी हटाव’ म्हणत होती;
पण समोरची झोपडपट्टी रोज वाढतच होती.

आणि आज ….
तो ‘अच्छे दिन’ येतील, असे म्हणत आहे;
पण आताही मला माहीत आहे,
तोही मला फसवत आहे, तोही मला फसवत आहे.

– मिनासो.

August 21, 2015