उत्कांती

एकदा मी एका कार्यक्रमासाठी गावाला गेलो होतो. कार्यक्रम संपायला रात्रीचे 12 वाजले. मी मित्राला, मला स्टेशनवर सोडायची विनंती केली. तो म्हणाला, एक दिवस कामाला नाही गेलास तर काय होईल? तू उद्या सकाळी पुण्याला जा. मी क्षणभर विचार केला व त्याला एक गोष्ट सांगितली,
कोणे एके काळी पृथ्वीवर फक्त एकपेशीय जीव (अमिबा) होते. त्यांना अन्न मिळवण्या शिवाय दुसरे काही करण्यास वेळ मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी एकत्र राहून काम वाटून घेण्याचे ठरवले. असा त्यांचा बहुपेशीय जीव तयार झाला. नंतर त्याची वाढ होत गेली व कामेही वाढत गेली. मग आळशी, कामचुकार पेशींची केस, नखे झाली, ताकदवान पेशींचे स्नायू झाले. ज्या वाहतूक करण्यात कुशल होत्या त्यांचे रक्त झाले. ज्यांची दुसऱ्यांसाठी बलीदान करण्याची तयारी होती त्यांची त्वचा झाली. ज्यांची दुसऱ्यांसाठी कष्ट करण्याची तयारी होती त्या पेशींचे हृदय झाले. ज्या पेशीं हुशार, तत्परतेने व वेळेवर काम करणाऱ्या होत्या त्यांचा मेंदू तयार झाला. या जीवात उत्क्रांती होत होत आजचे सर्व प्राणी व माणूस झाला.
आता माणसा बाबत पण हीच गोष्ट पुन्हा घडत आहे. पूर्वी माणूस एकटा राहायचा, आता समूहाने राहतो. कामे वाटून घेतली आहेत. एकमेकांच्या गरजा भागवत आहे. शेतकरी, सैनिक, डॉक्टर, शास्त्रज्ञ हे सर्व वेगवेगळी कामे करत आहेत. वाहतुकदार म्हणजे रक्त, (रस्ते म्हणजे रक्तवाहीन्या, रस्त्यात गप्पामारत उभे राहणारी माणसे म्हणजे कोलेस्टरॉल.) हे त्याचाच भाग आहेत. कालांतराने सगळयांचा मिळून एक विश्वमानव होणार आहे.
मग मित्राला म्हणालो — त्या विश्वमानवातील हाडाची पेशी होण्यापेक्षा हृदयाची किंवा मेंदूची पेशी होणे मला जास्त आवडेल. तुझ्या हृदयाच्या पेशी एखादा ठोका उशीरा पडला तर काय होतय? असे म्हणल्या किंवा मेंदूच्या पेशी निर्णय उद्या घेतला तर काय होतय? असे म्हटले तर ते तुला चालेल का?
म्हणून मला कामाला वेळेवर गेले पाहीजे. प्रत्येक व्यक्तीने शरीरातील पेशीप्रमाणे आपले काम जबाबदारीने केले, नियम पाळले तरच समाज निरोगी व सुदृढ राहील. तसेच समाजातील प्रत्येक घटक सारखाच महत्वाचा आहे याची जाणिव ठेवली पाहीजे.
केवळ आपल्या पुरते पाहणे (कॅन्सरच्या पेशी प्रमाणे) म्हणजे समाजाचा पर्यायाने आपलाच नाश करण्यासारखे आहे.

March 8, 2014