सुसंवाद

स्वतःशी सुसंवाद असणे हे सर्वात जास्त महत्वाचे आहे.
त्यामुळे आपल्यातील अधिक-उणेपणा, स्वभावातील खाचाखोचा आपल्याला माहीत असतात. मग त्या इतरांनी दाखवून दिल्यावर त्याचा राग येत नाही,
त्यामुळे इतरांशी संवाद साधणे सोपे जाते.

बुद्धी ही जर आपली व्यवस्थापक मानली तर ती इतरांशी संवाद साधत असते.
पण जेव्हा ती अहंकाराच्या सल्ल्याने संवाद साधू लागते तेव्हा विसंवाद सुरू होतो.
व जेव्हा ती मनाच्या(प्रेम, आपुलकी, सद्भावना) सल्ल्याने संवाद साधते तेव्हा सुसंवाद सुरू होतो.

अहंकार नेहमी “मीच बरोबर” असे म्हणत असतो. त्यामुळे तोच खरा सुसंवादातील मोठा अडसर असतो.

आपल्या मताविरूद्धचे बोलणे ऎकून घेणे म्हणजे जणू आपल्या अस्तित्वालाच धोका आहे असे काहीजणांना वाटते. खरं तर आपले म्हणणे योग्य व प्रामाणिक आहे याची आपल्याला खात्री असेल तर अशी भीती वाटण्याचे काही कारण नसते.

सामान्यतः संवादाचा मूळ हेतू विचारांची, माहीतीची देवाणघेवाण हाच असतो.
परंतू
मैत्रीत, घरात नाते जपणे,
नोकरी व्यवसायात काम चांगले होणे,
अनोळखी माणसाशी बोलताना एकमेकांना समजून (जाणून) घेणे,
असे वेगवेगळे पैलूही असतात.

सुसंवादासाठी दुसऱ्याच्या भूमिकेतून विचार करता येणे, ती समजून घेता येणे आवश्यक असते. त्यासाठी आपल्या तसेच इतरांच्या अनुभवांतून आपले ज्ञान वाढवणे गरजेचे असते.

सुसंवादात एकमेकांबद्दल विश्वास वाटणे गरजेचे असते. तो एकतर्फी होऊ शकत नाही.
समोरच्याने आपल्यावर विश्वास ठेवावा असे वाटत असेल तर आपण आधी त्याच्यावर विश्वास ठेवला पाहीजे.

हल्ली लोक लहान मुलांशी बोलतानाही मोठ्या माणसाशी बोलल्यासारखंच बोलतात.
त्यामुळे मुलं मोकळेपणाने बोलू शकत नाहीत. पिठीतील अंतर कमी करणे ही जबाबदारी आपण आपली समजली पाहीजे.
वैचारिकदृष्ट्या वरच्या पायरीवरील माणसानेच दोन पायऱ्या(सभ्यतेच्या नव्हे) उतरून सुसंवाद साधण्याचा प्रयत्न केला पाहीजे.

प्रत्येकजण वेगवेगळ्या धर्म, संस्कृती, संस्कार, परिस्थिती, शिक्षण यात वाढलेला असतो. त्यावरच त्याची मते बेतलेली असतात. ती मते तो सहजपणे बदलायला तयार नसतो हे नेहमी लक्षात ठेवायला हवे.

घरातील किंवा नात्यातील लोकांचे स्वभाव बरेच दिवस एकत्र राहील्यामुळे आपल्याला माहीत झालेले असतात. त्यामुळे काही वेळा गप्प बसणे हाही सुसंवादाचा भाग ठरू शकतो. प्रत्येक वेळी सुसंवाद हा बोलण्यातूनच साधला गेला पाहीजे असे नसते, तो कृतीतूनही साधता येतो.
मूक संवादाची ही कला माणूस जवळजवळ विसरूनच गेला आहे.

शेवटी,
सुसंवाद हा नुसता दिसायला सुंदर असून उपयोग नाही त्याचा परिणामही सुंदर असायला हवा.
जसे स्व-संवाद हा आपले मानसिक व शारिरीक स्वास्थ चांगले राखण्यासाठी आवश्यक असतो, तसाच सुसंवाद हा संसारीक व सामाजिक स्वास्थ चांगले राखण्यासाठी आवश्यक असतो याची जाणिव सगळ्यांनी ठेवली पाहीजे.

March 8, 2014